अंकात्मक विपणनामधील ध्येय - Objectives of Digital Marketing

Comments · 39 Views

This article is a piece of information about objectives and related aspects, especially revolving around Digital Marketing. There is a lot of information available in English and very little in Marathi so it's my bit effort to share this in the Marathi Language to benefit the entrepr

मी शाळेत असताना माझे ध्येय होत १० वी आणि १२ वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व्हायचे.

कारण एकच, तोपर्यंत माझ्या भावंडांपैकी कुणीच हे करू शकले नव्हते.

१० वी तर मी प्रथम श्रेणीत काढली परंतु १२वित ५०% वरच समाधानी राहावे लागले.

मग कसेतरी पुण्यात इंजिनीरिंगला ऍडमिशन मिळाली व नवीन ध्येय ठरवले ते लवकरात लवकर नोकरी मिळवून स्वतःचा खर्च भागवता यावा. कारण सर्वश्रुतच होते की माझ्या कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यातला खर्च भागवणे अवघड होते.

हे ध्येय मात्र मी लवकरच साध्य केले. ह्यात नवीन काहीच नाही माझ्या पिढीतले तसेच अगोदरच्या पिढीतले आणि माझ्या नंतरच्या पिढीतलेही बरेच जण कमी अधिक प्रमाणात ह्या परिस्तिथीमधून मार्ग काढून यशस्वी झालेत व होतील. 

सांगायचा मूळ उद्देश हा की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सगळेच काही ना काही ध्येय ठरवून पुढे जात असतो.

आपण जेव्हा आपला व्यवसाय सुरु करतो त्यावेळी सुद्धा काही ना काही ध्येय ठरवतोच मग विपणन खास करून अंकात्मक विपणन ( डिजिटल मार्केटिंग ) करताना ह्या कडे दुर्लक्ष का होत?

उलट हे माध्यम इतके पारदर्शी पद्धतीने वापरू शकतो की ध्येय ठरविणे, त्याचे मोजमाप करणे आणि मूल्यमापन करणे खूप सोपे आहे.

आलेल्या निष्कर्षावरून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासठी लागणारे बदल करणे सोपे होते.

अंकात्मक विपणन ( डिजिटल मार्केटिंग ) संदर्भातील ध्येय ठरविणे, त्याबद्दलचा आराखडा मांडणे आणि मोजमाप करणे या विषयावर पुढील काही  माझ्या आकलनानुसार माहिती आपल्यापुढे मांडणार आहे.

ह्या मध्ये खालील विषयांवर माहिती दिली जाईल -

✔️  विपणनाचे ( मार्केटिंग ) स्मार्ट ध्येय कसे ठरवावे?

✔️  जमेच्या बाजू,  कमतरता, उपलब्ध संधी आणि धोके यांचे विश्लेषण कसे करावे?

✔️  आपले योग्य ग्राहक कसे ओळखावे?

✔️  जास्तीत जास्त फायदा होईल असे अंकात्मक विपणन साधन कसे ठरवावे?

✔️  ठरवलेल्या ध्येयांचे मूल्यमापन कसे करावे?

✔️  आणि असेच बरेच काही...

याचा तुमच्या व्यवसायाचे अंकात्मक विपणन ( डिजिटल मार्केटिंग ) करण्यास उपयोग होईल अशी अपेक्षा करतो. तर सुरु करूया पहिला भाग -

? ध्येय ठरविणे ?

ह्याचे ५ वेगवेगळे भाग आहेत. त्यातील पहिला भाग बघूया.

१. ध्येय म्हणजे काय?

आपल्याला कुठेही फिरायला जायचे असल्यास आपण सर्वप्रथम कुठे जायचे हे ठरवतो मग बाकी सर्व गोष्टी ठरतात. म्हणजेच कुठे जायचे हे आपले ध्येय असत, त्याच प्रमाणे कोणीही जेंव्हा कोणताही व्यवसाय सुरु करतो तेव्हा सुरुवात होते ती ध्येय ठरवण्यापासून.

ध्येया शिवाय कोणतेही काम केल्यास त्याचा काहीच उपयोग नसतो.

आता उदाहरणादाखल आपण समजू की कुणी म्हणेल मला नवीन ग्राहक मिळवायचे आहेत.

तर त्याची सुद्धा ५ ( SMART ) भागांमध्ये नीट मांडणी करावी लागेल, जसे एक उदाहरण -

? ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मला दर महिन्याला १००० मराठी व्यवसायिकांपर्यंत अंकात्मक विपणाद्वारे पोचायचे आहे. ?

अ. म्हणजे हे एक विशिष्ट ( S = स्पेसिफिक ) ध्येय होते.

ब. ते मोजता येण्याजोगे म्हणजे त्याचे मूल्यमापण करता येण्यासारखे असावे? ( M = मेजरेबल )

क. ते प्राप्य असावे ( A = अचिव्हेबल )

ड. ते वास्तविक असावे ( R = रिऍलिस्टिक )

ई. आणि ते विशिष्ट वेळेत करण्यासाठी वेळ ठरवावी. ( T = टाईम बॉउंड )

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते लिहून काढावे आणि आपल्याला नेहमी दिसेल अश्या ठिकाणी लावावे.

?️ तुम्हाला जर तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या ४ पट पुढे राहायचे असेल तर स्मार्ट ध्येय निश्चित करणे आणि लिहिणे याला पर्याय नाही.

अंकात्मक विपणनाविषयीचे ध्येय ठरवण्यासाठी तुमचे व्यावसायिक स्मार्ट ध्येय ठरवलेले असल्यास खूप सोपे होते. अपेक्षा करतो की ध्येय म्हणजे काय हे यावरून लक्षात आले असेलच.

पुढे  बघूया -

२. ध्येय ठरविणे का महत्वाचे आहे?

३. अंकात्मक विपणनाचे ध्येय यांची उदाहरणे

४. लांबीचे ध्येय छोट्या छोट्या भागात कसे विभाजन करावे?

५. आजचे ध्येय १०पट कसे करावे?

? ध्येय ठरविणे का महत्वाचे आहे? ?

अभ्यासानंतर (सर्वे) नुसार आलेली काही आकडेवारी खाली देत आहे.

? ३९७% जास्त यश - मार्केटर्स जे सुसंघटितपणे (ऑर्गनाइज्ड) काम करतात ते इतरांपेक्षा ३९७% जास्त यशस्वी असतात.

हे सर्व ऑर्गनाइज्ड मार्केटर्स त्यांची सुरवात ध्येय लिहिणे आणि रणनीती आखणे इथून करतात.

? त्यापैकी ७०% मार्केटर्स हे आपले ध्येय बहुतेक वेळा पूर्ण करण्यात यशस्वी होतात.

? तर त्यातही १०% योग्य पद्धतीने काम करणारे मार्केटर्स हे त्यांचे ध्येय निश्चित वेळेत पूर्ण करतात.

? उदाहरणासह बघूया - ?

समजा मी ध्येय निश्चिति न करता माझे डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन सुरू केले तर मी त्याचे यशाचे मोजमापच करू शकणार नाही. म्हणजे आज मला माझ्याकडे नवीन ग्राहक चौकशी यावे असे वाटून त्यासाठी डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन सुरु केले तर त्याचे योग्य मोजमाप करता येणार नाही.

त्या उलट जर मी असे ध्येय ठेवले कि, मला या आठवड्यात १०० नवीन ग्राहक चौकशी हव्या आहेत तर सुरु केलेले कॅम्पेन कितपत यशस्वी झाले हे आठवड्याच्या शेवटी तर मूल्यमापन करता येतेच परंतु सुरुवातीलाच अपल्याला हे ठरवता येते कि किती खर्च करावा आणि तुमची जाहिरात सुरु असताना सुद्धा आपल्याला हवे तसे निष्कर्ष मिळतात का याचे मोजमाप करता येते व त्याप्रमाणे बदल करता येणे अंकात्मक विपणनामध्ये शक्य आहे.

वरील सर्व आकडेवारी आणि उदाहरण हे दर्शविते कि सुयोग्य पद्धतीने म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे ध्येय निश्चिती करून काम केल्यास उत्तम प्रकारे यश प्राप्त होते.

आपला अनावश्यक खर्च होणारा वेळ व पैसा वाचतो.

म्हणून व्यवसायाचेच नव्हे तर अंकात्मक विपणनाचे (डिजिटल मार्केटिंग) चे सुद्धा स्मार्ट (SMART) ध्येय निश्चित करणे महत्वाचे आहे. हे ध्येय दूरदृष्टी ठेऊन ठरवावे व त्याचे १ वर्ष, ६ महिने, ३ महिने व १ महिना असे विभाजन महत्वाचे आहे.

? अंकात्मक विपणनाचे ध्येय याचे उदाहरण ?

कुठलाही व्यवसाय करण्यामागे मूळ उद्देश हा व्यवसायवृद्धी असतो आणि त्याचे खालील प्रमाणे काही प्रमुख भाग असतात -

✅ विक्री,  उलाढाल आणि फायदा वाढविणे.

✅ उद्योगाची प्रसिद्धी वाढविणे.

✅ व्यवसायाचा विस्तार करणे.

✅ व्यवसायासंदर्भातील भागधारकांसमवेत (गुंतवणूकदार, निष्ठावंत ग्राहक, नवीन ग्राहक, संभाव्य ग्राहक, कच्चा माल पुरवठादार आणि असे इतर) संबंध मजबूत करणे.

✅ नवीन आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे.

अंकात्मक विपणन (डिजिटल मार्केटिंग) करताना हे सर्व उद्देश दोन प्रमुख भागांत विभागले जातात.

? १. व्यवसायाची प्रसिद्धी वाढविणे (ब्रँड अवेअरनेस)

उदाहरणार्थ - तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे.

समजा मी एखाद्या ऑनलाईन शिकवणीची जाहिरात फेसबुक या माध्यमावर सुरु केली आणि ती ५ दिवसात ५०,००० लोकांच्या फेसबुकवर दिसली म्हणजे माझ्या त्या शिकवणीची प्रसिद्धी तितक्या लोकांपर्यंत (ब्रँड रिच) झाली असे आपण समजू शकतो.

? २. व्यवसाय वृद्धी करणे (रेव्हेन्यू जेनेशन)

याला आपण नवीन ग्राहक निर्मिती किंवा संभाव्य ग्राहकांपर्यंत (लिड जनरेशन) पोहोचणे असे म्हणूया.

उदाहरणार्थ - समजा आपण वरील उदाहरणातील ऑनलाईन शिकवणीच्या जाहिरातीमधून त्यांच्याकडे त्याच ५ दिवसात ३०० लोकांनी चौकशी केली म्हणजे त्या शिकवणीच्या व्यवसायवृद्धीसाठी ३०० नवीन संभाव्य ग्राहक आलेत असे आपणास दिसते.

हे सर्व आपण फेसबुक, गूगल, यु-ट्युब, इंस्टाग्राम, लिंक्ड-इन व इतर शेकडो माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तसेच ह्या सर्वांचे मोजमाप सुद्धा उत्तमरित्या करू शकतो. परंतु ध्येय निश्चिती केल्या शिवाय केल्यास वेळेचे आणि पैशाचे बरेच नुकसान होण्याचा धोका आहे.

आता बघूया वरील उदाहरणांसाठी आपण ध्येय कसे निश्चित करू शकतो.

? पुढील ५ दिवसात मला ऑनलाईन शिकवणीसाठी दररोज रु. ५००/- प्रमाणे खर्च करून पुणे आणि परिसरातील कमीत कमी ५०,००० ईयत्ता ८वी ते १०वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचून कमीत कमी ३०० नवीन संभाव्य चौकशी मिळायला हवीत.

ह्याचे मूल्यमापण कसे करायचे हे आपण पुढे बघूया.

त्या अगोदर आपण बघू, लांबचे ध्येय छोट्या छोट्या भागात कसे विभाजन करावे?

? लांबचे ध्येय छोट्या छोट्या भागात कसे विभाजन करावे? ?

ध्येय ठरवण्याच्या पद्धतीमधील हा भाग सर्वात सोपा आहे. बहुतेक वेळा व्यायसायिक ध्येय ठरवताना ते १ / २ / ३ ते ५ वर्षापर्यंत ठरवतात आणि ते बऱ्याचद व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात (प्रोजेक्ट रिपोर्ट) नमूद केलेले असतं.

?  दुःखाची बाब म्हणजे बरेच उद्योजक त्याकडे दुर्लक्ष करतात.

विपणनाचे ध्येय हे व्यावसायीक ध्येयावरूनच ठरवावे म्हणजे आपण आपल्या व्यावसायिक उद्देशपूर्तीकडे निश्चितपणे जाऊ शकतो.

तीच आपली अंकात्मक विपणनाची दिशा ठरवणारे मुख्य स्रोत असतं.

नेहमीप्रमाणे आपण उदाहरणासह बघूया.

? समजा एखाद्या व्यावसायिकाचे ध्येय - १ वर्षात रु. ५००००००/- चे उत्पन्न मिळवायचे आहे.

आणि त्यांची एका वस्तूची सामायिक (ऍव्हरेज) किंमत र. ५००/- असेल तर त्यास १ वर्षात १०,००० वस्तूंची विक्री करावी लागेल.

? तर त्यावरून ६ महिन्यात ५०००,  ३ महिन्यात २५०० तसेच १ महिन्यात अंदाजे ८३४ वस्तूंची विक्री करावी लागेल.

आपण जेवढे जवळचे ध्येय ठरवणार असू तेवढे योग्य (SMART) पद्धतीने ते मांडावे.

? म्हणजे या उदाहरणात १ महिन्यात ८३४ वस्तूंची विक्री करायचे असल्यास त्यासाठीची मांडणी करावी लागेल.

आता याचा पुढील भाग असा की समाजा या उद्योजकाकडे १० नवीन चौकश्या आल्या कि ४ वस्तू विकल्या जात असतील आणि १०० नवीन लोकांपर्यंत पोहोचले तर १० नवीन चौकश्या येत असल्यास यांचे उद्दिष्ट -

१ महिन्यामध्ये  - कमीत कमी २०,८५० लोकांपर्यंत पोहाचुन २०८५ नवीन वस्तू विक्रीच्या चौकश्या याव्यात व नंतर ४०% रूपांतरण प्रमाणाच्या आधारे (कॉन्व्हर्शन रेशो)  ८३४ वस्तूंची होऊ शकेल.

ह्याचा आधार घेतल्यानंतर आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत, कोठे आहेत आणि त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे याचे मार्ग ठरवावे लागतात आणि हे निश्चित करावे लागते की ठरवलेले ध्येय गाठणे यासाठी किती खर्च लागेल. तेवढा खर्च त्या घडीला आपण करणार आहोत का किंवा काय?

हा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर कदाचित ध्येय बदलण्याचीसुद्धा गरज पडेल.

म्हणून हा सर्व अभ्यास करून ध्येय निश्चिती करणे गरजेचे असतं.

या सर्व पैलूंवर या पुढील भागांमध्ये आपण चर्चा करूया.

? आजचे ध्येय १०पट कसे करावे? ?

आपण बघितले कि लांबचे ध्येय कसे ठरवायचे आणि त्यावरून १ महिन्याच्या ध्येया पर्यंत कसे यायचे.

आता या १ महिन्याच्या ध्येयावरून आपल्याला अंकात्मक विपणनामध्ये किती खर्च येईल याचा अंदाज बांधता येतो आणि त्या अनुषंगाने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळूतात, जसे की -

❓ लागणारा खर्च आपण करायला तयार आहोत कि नाही?

❓ निर्माण झालेली मागणी (सप्लाय कॅपॅसिटी) आपण पुरवू शकणार आहोत का?

❓ विक्री नंतरचा ग्राहकास लागणारी सहायता (कस्टमर सपोर्ट) आपण पुरवू शकणार आहोत का?

ह्यांची उत्तरे शोधावी लागतात आणि मग परत एकदा ध्येय निश्चिती करायची असते.

? मागील उदाहरणावरूनच आता पुढे जाऊया.

मागील उदाहरणात आपण बघितले कि १ महिन्याचे ध्येय हे ८३४ वस्तू विक्रीचे होते.

परंतु समजा सारासार विचार करता तेवढा पुरवढा कुठल्याही कारणाने करू शकणार नाही आणि फक्त ६०० वस्तूच आपण पुरवू शकणार आहे.

आणि सर्व गणित मांडल्यास एक नवीन चौकशी (न्यू लीड) रु. १५ /- इतका खर्च (अंकात्मक विपणनामध्ये) होत असेल आणि उदाहरणाप्रमाणे चौकशी ते विक्री चे प्रमाण ४०% गृहीत धरल्यास ६०० वस्तूंची विक्री करण्यासाठी १५०० नवीन चौकशी निर्माण करण्याचे ध्येय १ महिन्याचे ठेवावे लागेल.

? त्याप्रमाणे १ महिन्याचा खर्च १५०० X १५ = रु. २२,५००/- या पद्धतीने १ वर्षाचा खर्च रु. २,७०,०००/- होईल आणि विक्री ध्येय असेल ७,२०० वस्तू.

? ह्याला १०पट करणे म्हणजे आपल्याला हे सर्व करण्याला लागणारा वेळ, मनुष्यबळ आणि पैसा तेवढ्याच प्रमाणात वाढवावा लागेल.

एकदा वरील आकडेवारी बद्दल आणि ध्येया बद्दल स्पष्टता आली कि मग त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणी संसाधने (स्वतः करणे / बाहेर देणे / ऑटोमेशनचा वापर करणे), त्यासाठी लागणारा पैसा उभारणे आणि कमीत कमी वर्षभरासाठीची तयारी करणे हे सर्व आले.

त्यासोबत तुमचा अपेक्षित ग्राहक वर्ग कुठे आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीची तयारी करावी लागेल.

असे हे आपणास खर्च, पुरवठा आणि विक्रीचे अंदाज बांधून ध्येय ठरवावे लागेल.

? अंकात्मक विपणनामधील ध्येय ?

आता अंकात्मक विपणन (डिजिटल मार्केटिंग) मधील ध्येय याबद्दल जाणून घेऊ. 

यामध्ये मुखत्वे २ प्रकार असतात -

? प्रकार १: प्रसिद्धी संबंधित (ब्रॅण्डिंग)

प्रसिद्धी संबंधित ध्येयामध्ये प्रामुख्याने तुम्ही पुरवणारी  वस्तू / सेवा (प्रॉडक्ट / सर्व्हिस) याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविणे असे असते.

तसेच आपले / आपल्या संस्थेचा नाव लौकिक वाढवावा हे सुद्धा ध्येय या प्रकारात मोडते.

आपल्या वेबसाईट वर जास्तीत जास्त लोकांनी यावे, फेसबुक आणि लिंक्ड-इन पेज ला लाईक मिळवणे हि याची काही उदाहरणे आहेत. हे सर्व ध्येय ठरवून आपल्याला करता येते.   

? प्रकार २: नवीन ग्राहक मिळवण्यासंबंधी (लीड जेनरेशन)

या प्रकारात सरळ सरळ ध्येय हे नवीन ग्राहक निर्मिती संबंधित असते.

यामध्ये तुमच्या वेबसाईट वर किती व्हिसीट्स येतात किंवा फेसबुक आणि लिंक्ड-इन पेज ला किती लाईक मिळतात या पेक्षा किती लोक त्यांची माहिती नाव, ई-मेल आणि फोन नंबर (तुम्हाला हवी ती) द्यावी हे महत्वाचं असतं.

हि माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून विक्रीची पुढील प्रक्रिया सुरु करू शकता.

ह्या दोन्ही प्रकारांचे सविस्तर उदाहरणासह स्पष्टीकरण बघूया.

? प्रकार १: प्रसिद्धी संबंधित  (ब्रॅण्डिंग)

मुखत्वे वस्तू किंवा सेवा, त्याचे उपयोग, कुणासाठी त्या वस्तू आहेत किंवा ते सर्व कोणत्या अडचणी सोडवतात यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे म्हणजे त्या वस्तू किंवा सेवेची प्रसिद्धी वाढविणे (ब्रॅण्डिंग) असे म्हणतात.

ब्रॅण्डिंग हे फक्त वस्तू किंवा सेवांपर्यंत मर्यादित न राहता त्या वस्तू / सेवा पुरवणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींची सुद्धा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तसेच सामाजिक संस्था, राजकारणी लोक, त्यांचे राजकीय पक्ष यांना सुद्धा अंकात्मक विपणनाद्वारे प्रसिद्धी करणे गरजेचे आहे हे समजले आहे व ते अमलात आणले जाते. काही अंशी धार्मिक संस्था आणि अध्यात्मिक गुरु हे सुध्या ह्या माध्यमांपासून दूर राहिलेले नाहीत.

असो, आता बघूया अंकात्मक विपणनाद्वारे प्रसिद्धीचे किती प्रकारचे ध्येय ठरवता येतील -

? १. वेबसाईट वरील भेटी - यामध्ये प्रत्येक दिवसाला / आठवड्याला / महिन्याला किती लोकांनी आपल्या वेबसाईट वर भेट द्यावी हे ध्येय ठरवून त्याप्रमाणे पुढची कृती योजना (ऍक्शन प्लान) आखता येईल.

? २. लाईक, कंमेंट, शेअर - जवळ जवळ सर्वच सामाजिक माध्यमांमध्ये (सोशल मीडिया) थोड्या फार फरकाने लाईक, कंमेंट आणि शेअर ह्या कृती टिपता येतात. म्हणजे माझ्या ह्या लेखावर किती लोकांनी लाईक, कंमेंट आणि शेअर केलय हे मला मोजता येते आणि त्या प्रकारचे ध्येय सुद्धा आपल्याला ठेऊन पुढचा मार्ग आखता येतो.

? ३. फ्रेंड्स, फॅन्स आणि फॉलोअर्स - सामाजिक माध्यमांवर नवीन आणि भरपूर मित्र मिळवणे किंवा फॉलोअर्स मिळवणे हे सुद्धा ध्येय ठरवता येते.

याचा फायदा असा की जेवढे जास्त मित्र / फॉलोअर्स त्या प्रमाणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही टाकलेली माहिती पोहोचण्याची शक्यता वाढते.

हा प्रकार प्रत्येक माध्यमानुसार वेगवेगळा असतो आणि आपण त्याबद्दल पुढील लेखामध्ये चर्चा करूया.

वर सांगितल्याप्रमाणे, या प्रकारच्या ध्येयांचा प्रसिद्धीसाठी उपयोग होतो आणि लगेच तुमच्या व्यवसायवाढीपेक्षा दूरदृष्टी ठेऊन याचा उपयोग केल्यास काही कालावधीनंतर तुमचा ऍडव्हर्टीसमेन्ट वरील खर्च कमी होऊ शकतो. ते सुद्धा तुमचा व्यवसाय कुठल्या प्रकारचा आहे त्यावर हे अवलंबून आहे.

हा खूपच वेळखाऊ प्रकार आहे परंतु १ वर्षाचं उद्दिष्ट स्पष्ट असेल तर तसा कृती आराखडा तयार करून अनुसरणे सोपे जातं.

? प्रकार २: नवीन ग्राहक मिळवण्या संबंधी (लीड जेनरेशन)

कुठलाही उद्योग जेव्हा छोटा किंवा नवीन असतो त्यावेळी, हा ध्येय प्रकार म्हणजे नवीन ग्राहक मिळवणे (लीड जेनरेशन) सर्वात महत्वाच असतं कारण त्यातूनच लवकरात लवकर विक्री होण्याची शक्यता असते.

लिड जेनरेशन म्हणजे तुमची वस्तू किंवा सेवा घेण्यास उत्सुक असणाऱ्या व्यक्तींची (नाव, फोन नंबर, ई-मेल इत्यादी) माहिती मिळविणे.

एकदा तुमच्या कडे हि माहिती मिळाली कि नंतर त्यांना योग्य माहिती पुरवणे आणि वस्तू किंवा सेवा घेण्यास उद्युक्त करण्याची प्रक्रिया सुरु करावी.

हि नवीन चौकशी आल्या नंतर व्यवसायाप्रमाणे तसेच व्यावसायिकाच्या विक्री कौशल्यानुसार विक्रीमध्ये रूपांतरण होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.

तर या सर्व मापदंडावरून आपल्याला किती विक्री करायची आहे त्या प्रमाणात नवीन चौकशी मिळवण्याचे ध्येय ठरवावे.

 ? उदाहरणार्थ: जर एखाद्या व्यावसायिकास एका दिवसात १० नवीन चौकश्या आल्यानंतर तो त्याच्या वस्तूंची / सेवांची विक्री ४ ग्राहकांमध्ये करत असल्यास त्या उद्योजकाचे रूपांतरण प्रमाण (कन्व्हर्शन रेशो) हा ४०% आहे असे गृहीतक असेल.

जर एका वस्तूची सर्वसाधारण किंमत रु. ५००/- असेल आणि त्या व्यावसायिकास एका महिन्यात रु. १२०,०००/- चे विक्री ध्येय गाठायचे असेल तर त्या व्यावसायिकास एका महिन्यात २४० वस्तूंची विक्री करण्यासाठी ६०० नवीन ग्राहक चौकशी मिळवावी लागेल.

म्हणजे रु.५०० X २४० = रु १२०,०००/- हे ध्येय गाठता येईल. 

या पद्धतीने नवीन ग्राहक चौकशी मिळवण्याचे ध्येय ठरवण्याची पद्धत अवलंबावी.

? सारांश: अंकात्मक विपणनामधील ध्येय ?

येथे मागील सर्व माहितीचा अल्पसा सारांश खाली देत आहे.

? १. ध्येय ठरविणे - ध्येय म्हणजे काय?  ?

आपण जाणून घेतले ध्येय म्हणजे काय आणि त्यातील कोणते ५ वेगवेगळे भाग असतात याबद्दल.

हे ५ स्मार्ट (SMART) पद्धतीने ठरवून लिहून कसे काढावे याचा समावेश केला गेला होता.

 ? २. ध्येय ठरविणे का महत्वाचे आहे? ?

ध्येय ठरविणे का महत्वाचं असते हे उदाहरणासह बघितले.

त्यातील मोजमाप करता येणे हे किती महत्वाचं असत हे पण आपण येथे समजून घेतले आहे.

? ३. अंकात्मक विपणनाचे (डिजिटल मार्केटिंग) ध्येय याचे उदाहरण ?

अंकात्मक विपणनाचे ध्येय उदाहरणासह समजून घेतले आहे आणि त्यातील २ मुख्य प्रकार सुद्धा आपण बघितले आहेत.

? ४. लांबचे ध्येय छोट्या भागात कसे विभाजन करावे? ?

लांबचे ध्येय हे छोटया भागात कसे विभागायचं आणि त्यापासून परत लांबच्या ध्येया पर्यंत कसे जायचं,

हे सर्व आपण रिव्हर्स इंजिनीरिंग पद्धतीने उदाहरण घेऊन करून बघितले आहे.

? ५. आजचे ध्येय १०पट कसे करावे? ?

पाचव्या दिवशी आपण आजचे योग्य ध्येय कोणते, तसेच त्याला वाढवायचे कसे ह्याबद्दल चर्चा केली.

? ६. अंकात्मक विपणनामधील ध्येय ?

अंकात्मक विपणनाबद्दलच्या ध्येयांची आणि त्यातील २ प्रकारची ओळख करून घेतली.

? ७. अंकात्मक विपणनामधील ध्येय - प्रसिद्धी संबंधित  (ब्रॅण्डिंग) ?

अंकात्मक विपणनमधील प्रमुख ध्येयामधील पहिला प्रकार विस्ताराने जाणून घेतला

या मध्ये प्रसिद्धी संबंधित (ब्रॅण्डिंग) बद्दलचे ध्येय प्रकार उदाहरणासह समजून घेतले.

? ८. अंकात्मक विपणनामधील ध्येय - नवीन ग्राहक मिळवण्या संबंधी (लीड जेनरेशन) ?

अंकात्मक विपणनामधील दुसरा ध्येय प्रकार किती महत्वाचा आहे हे समजले.

अंकात्मक विपणनामधील ध्येय हा प्रकार, नवीन ग्राहक मिळवण्या संबंधी (लीड जेनरेशन) म्हणजे उद्योगाचं प्राणवायू असतो. म्हणून त्याबद्दचे ध्येय अचूक असणे व त्यावर पूर्ण लक्ष ठेवणे गरजेचं असत. या मध्ये सुद्धा आपण उदाहरण घेऊन सर्व समजून घेतले.

?‍♀‍ मला अशा आहे कि आतापर्यंतची हि सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असावा हि अपेक्षा करतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते खाली कंमेंट करून नक्की सांगा आणि पुढील लेखांमध्ये तुम्हाला काय नवीन माहिती हवी ते पण कळवा.

मला फेसबुक वर भेटा - https://www.facebook.com/milindjoshi1912

मला लिंकेडइन वर भेटा - https://www.linkedin.com/in/milindjoshi1912

Comments
Gaurav Guru 1 month ago

डिजिटल मार्केटिंग !

 
 
Gaurav Guru 1 month ago

Check out the google rankings for अंकात्मक विपणनामधील ध्येय ;)